नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुना गंगापूरनाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये दोन अज्ञात इसमांनी सेफ्टी लॉकर ‘साफ’ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ४ कोटी ९२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहे. सरकारवाडा पोलिसांकडून सोमवारी (दि.६) दिवसभर गुन्हे शोध पथकाने सुमारे २० जणांना पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी केली.
चोरांनी ओळख लपवून कोविड पीपीई सूट व हुडी परिधान करू लॉकर उघडून दागिने लंपास केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. फुटेजवरून या चोरीमागे फायनान्स कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींचा हात असण्याचा संशय आहे. पोलिसांकडून दिवसभर कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदवून घेण्यात आले. नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे अगदी सहजरीत्या चोरटे फायनान्स कार्यालयात वावरताना दिसतात. त्यामुळे त्यांना हा परिसर अगोदरपासून ज्ञात असल्याचे स्पष्ट होते. मुख्य व्यवस्थापकांची कॅबिन कोठे आहे? लॉकरच्या किल्ल्या कोठे ठेवलेल्या आहेत? लॉकर उघडण्याची पद्धत कशी असते? ते किती किल्ल्यांनी उघडते? या सर्वांची माहिती अगोदर असल्याशिवाय ही चोरी करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे पोलिसांची संशयाची सुई आजी-माजी कर्मचाऱ्यांवर आहे.
किल्ल्या पुन्हा जागच्या जागी:
शनिवारी कर्मचाऱ्यांनी लॉकर उघडण्यासाठी किल्ल्या घेतल्या तेव्हा त्या मूळ ठिकाणी जागच्या जागी ठेवण्यात आलेल्या होत्या. लॉकरमधील दागिने पिशवीत भरल्यानंतर चोरट्यांनी लॉकर पुन्हा पूर्वीसारखेच बंद केलेले आढळून आले आहे. लॉकर एक चोरटा उघडतो व दुसरा फरशीवर बसलेला असतो.
म्हणून कुणकुण लागली नाही:
चोरटे इमारतीच्या पाठीमागील बाजूने खिडकीतून कार्यालयात शिरले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम धोक्याची सूचना देणारा ‘अलार्म’ बंद केला. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा सायरन वाजणार नाही आणि कार्यालयाच्या मुख्यद्वारावर ड्यूटीवर असलेला सुरक्षारक्षक सावध होणार नाही, यासाठी चोरट्यांनी ही शक्कल लढविली.