नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिक परिसरातील नानावली परिसरात चोरीछुप्यारितीने प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून ९७ हजार २१३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करीत एकाला अटक केली आहे.
मोसिन यूनूस सय्यद (३१, रा. अहमद रजा चौक, नानावली, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार अमोल कोष्टी यास प्रतिबंधित गुटख्याची खबर मिळाली होती. युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके. विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांच्या पथकाने नानावलीतील अहमद रजा चौकातील एका घराची पाहणी केली. त्यावेळी संशयित सय्यद प्रतिबंधित पानमसाला सुगंधीत तंबाखु अवैधरित्या विक्री करीत होता. पथकाने संशयित सय्यद यास अटक करून त्याच्या ताब्यातून साठा केलेला प्रतिबंधित गुटखा असा ९७ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयिताकडे केलेल्या चौकशीतून सदरील गुटखा त्याने वैभव उर्फ अशोक मोराडे याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.