नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पवननगरच्या ग्लोबल हॉस्पिटल येथील डॉ. दिनेश पाटील यांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉ. दिनेश पाटील यांना अमानुषपणे मारहाण केली होती.
नाशिक शहरातील शासकीय आणि अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पवननगर येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे एका कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. दिनेश पाटील तसेच हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली होती. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला आणि संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. याप्रकरणी डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी ताबडतोब पावले उचलली. याप्रकरणी पियुष उल्हास राजूरकर (वय ३०, राहणार: गुंजाळबाबा नगर, हिरावाडी), आकाश अशोक पाटील (वय २६, राहणार: वाल्मिकनगर, वाघाडी), संग्राम बारकू पाटील (वय ४४, राहणार: पाण्याच्या टाकीजवळ, देवीमंदिराशेजारी, वाघाडी, पंचवटी) यांना गुरुवारी (दि. ४ ऑगस्ट २०२०) अटक करून कोर्टासमोर हजार केले. कोर्टाने सर्व आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव करत आहेत.