नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव पोलिस ठाण्यात येऊन पोलीस अंमलदारास शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व ६ हजारांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये सदरची घटना घडली होती.
जितेंद्र निंबा पाटील (२९, रा. सत्यम रो हाऊस, आडगाव शिवार) असे आरोपीचे नाव आहे. ७ मार्च २०१७ रोजी रात्री बाराच्या सुमारास आरोपी पाटील हा आडगाव पोलिस ठाण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील हे कर्तव्यावर असताना त्यांच्यासह अंमलदारांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणी आडगाव पोलिसात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. महिरे यांनी केला आणि जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम.आय. लोकवाणी यांच्यासमोर खटल्याचे काम झाले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहताना साक्षीदार तपासले.
आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला सहा महिने साधा कारावास व ६ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार प्रेरणा अंबादे, हवालदार सोमनाथ शिंदे, महिला हवालदार एस.टी. बहिरम यांनी पाठपुरावा केला.