नाशिक (प्रतिनिधी): दोन दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात चिंचोली गुरव ता. संगमनेर येथील 37 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. दोघा मित्रांनी त्याची हत्या केल्याचा प्राथमिक संशय होता. कसारा रेल्वे स्थानकातून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या या दोघा संशयितांना वावी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
31 मार्च च्या दिवशी चिंचोली गुरव गावातील तिघा मित्रांनी मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण झाले. त्यातून दिलीप सोनवणे याची कृष्णा जाधव रा चिंचोली गुरव व अजय शिरसाट रा. चास ता. सिन्नर या दोघांनी डोक्यात दगड घालून हत्या केली होती.
बेपत्ता झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दिलीप सोनवणे याचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात निर्जनस्थळी आढळून आला होता. हा मृतदेह कुजल्यामुळे व चेहऱ्याचा भाग विद्रुप केलेला असल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे होता. मात्र नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवत दिलीप यांच्यासोबत असलेल्या दोघा मित्रांवर संशय व्यक्त केला होता.
ते दोघे तीन दिवसांपासून बेपत्ता होते तसेच त्यांचे मोबाईल फोन देखील बंद होते. त्या दोघांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांनी उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तपासासाठी नियुक्त केली होती. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील समांतर तपासासाठी पथक नेमण्यात आले होते.
दोघे संशयित कसारा रेल्वे स्थानक परिसरात फिरताना आढळून आले होते. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक श्री. सुर्वे यांनी वावी पोलिसांना सूचना देऊन गुन्हे शाखेच्या पथकास कारवाईसाठी रवाना केले. इगतपुरी पोलिसांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. कृष्णा जाधव व अजय शिरसाट हे दोघे रेल्वे फलाटावर आले असता पोलीस पथकांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, विश्वनाथ काकड, प्रदीप बहीरम, विकी म्हसदे, वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पारस वाघमोडे, हवालदार सचिन काकड, इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी, शिपाई अभिजीत पोटिंदे यांच्या पथकाने दोघा संशयित आरोपीतांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला.