नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून नाशिकमधून देशभरातील ३० महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या शहरांमध्ये थेट सेवा सुरू होईल; तर उर्वरित शहरांना हैदराबाद व अहमदाबादमार्गे पोहोचता येणार आहे. इंडिगो कंपनीने नाशिकसाठी विमान सेनेचे नवीन शेड्यूल जाहीर केले.
यात उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या प्रमुख शहरांसाठी थेट सेवा मिळणार आहे. इंदूरसाठी मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस सेवा मिळेल. उर्वरित शहरांसाठी दररोज विमानसेवा सुरू राहील. देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी नाशिकमधील उद्योजकांची अनेक वर्षांपासूनची मागणी यानिमित्त पूर्ण होत आहे.
अमृतसर शहरासाठी अहमदाबादमार्गे मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार असे चार दिवस सेवा राहील. त्याचबरोबर बंगळूरसाठी हैदराबादमार्गे दररोज सेवा दिली जाणार आहे. भोपाळसाठी अहमदाबादमार्गे सोमवार व मंगळवार, तसेच गुरुवार ते रविवार असे सहा दिवस सेवा दिली जाईल.
हैदराबादमार्गे महत्त्वाची शहरे जोडणार:
नवीन शेड्यूलमध्ये भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकाता या शहरांना हैदराबादमार्गे सेवा पुरविली जाणार आहे. त्याचबरोबर लखनौसाठीही हैदराबादमार्गे सेवा दिली जाईल. तिरुअनंतपुरम, अमृतसर, चंडीगड, कोची, राजमुंद्री, कोझिकोड, मंगळूर, रायपूर व विजयवाडा या शहरांना दररोज हैदराबादमार्गे सेवा दिली जाणार आहे.
अहमदाबादमार्गे दिल्ली:
दिल्लीसाठी नाशिकहून अहमदाबादमार्गे सेवा दिली जाणार आहे. दिल्लीहून सकाळी ६.१० ला विमानाचे उड्डाण होईल. अहमदाबादमार्गे दर बुधवारी १०.२५ ला नाशिकला विमान उतरेल.
”देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी नाशिकमधील उद्योजकांची अनेक वर्षांपासूनची मागणी यानिमित्त पूर्ण होत आहे.”- मनीष रावल, अध्यक्ष, निमा एव्हिएशन कमिटी