नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): क्राईम ब्रांचच्या युनिट १ ने गुरुवारी (दि. ४ एप्रिल २०२४) पेठ रोडला तब्बल १८ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला आहे. पेठ रोडकडून भक्तिधामच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमध्ये या गुटख्याची वाहतूक होत होती. याप्रकरणी ट्रकचालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे.
युनिट १ चे हवालदार प्रदीप म्हसदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, ट्रक क्रमांक: एमएच १२- एमव्ही ७५१० यात दोन व्यक्ती प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पेठरोड कडून भक्तिधामकडे येणार आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे युनिट १ चे पथक मोती सुपर मार्केट समोर, पेठरोड पंचवटी येथे सापळा लावुन थांबले. त्यावेळी एक अशोक लेलॅण्ड भगवा व सफेद रंगाचे पट्टे असलेला ट्रक क्रमांक एम.एच १२-एम.व्ही-७५१० येतांना दिसला. त्याला थांबवुन सदर ट्रकचालक व क्लिनर यांना खाली उतरवून ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये विक्रीकरीता आणलेला एकुण १८,५७,१२० रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा अशोक लेनन ट्रकमध्ये वाहतुक करतांना मिळुन आला.
याप्रकरणी अमोल ज्ञानोबा इंगुळकर (वय-३७वर्षे, धंदा-चालक, रा-मु.पो कामथडी ता. भोर जि.पुणे) आणि जाबीर अफजल बागवान (वय-३६वर्षे, धंदा-क्लीनर, रा-घर नं ५९ बुधवार पेठ, बाराटक्के चौक शेजारी, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
गुटख्याचा साठा तसेच ट्रकसह एकुण ३०,०७,१२० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीतांविरूध्द सरकारतर्फे पोलिस हवालदार प्रदिप म्हसदे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक: गजानन इंगळे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार: प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, प्रवीण वाघमारे, पोलीस नाईक: प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार: विलास चारोस्कर, जागेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड यांच्या पथकाने केली.