नाशिक (प्रतिनिधी): सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये नेपाळी युवकाच्या खुनाची अखेर उकल करण्यात पोलिसांना यश आले. मयत महेंद्रा सारकी (२२) याच्या दोघा मित्रांनी त्याचा गळा सुरीने चिरून खून केल्याची कबुली दिली आहे. नेपाळस्थित युवतीशी महेंद्राचे प्रेमप्रकरण असताना संशयितानेही त्याच मुलीशी संपर्क साधला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग धरून संशयितांनी महेंद्रा सारकीचा काटा काढल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.
ईश्वर शेर सारकी (२०, मूळ रा. हाटगाव, अजयमेरू, जि. डडेलधुरा, नेपाळ. सध्या रा. कौशल्यव्हिला, कामगारनगर, सातपूर), प्रकाश गोविंदबहादूर शेटी (४२, रा. हाटगाव. सध्या रा. कौशल्यव्हिला, कामगारनगर, सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, न्यायालयाने दोघांना शनिवारपर्यंत (ता. ६) पोलीस कोठडी सुनावली आहे.
मयत महेंद्रा सारकी याचा सोमवारी (ता. १) सकाळी गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आढळून आला होता. महेंद्रा हा पाईपलाइन रोडवरील एका हॉटेलमध्ये कुक होता. तर, त्याच हॉटेलमध्ये काम करणारे मूळचे नेपाळकडील १२ ते १४ जणांसह तो कौशल्यव्हिला अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहत होता.
महेंद्रा याचे नेपाळमधील युवतीशी प्रेमप्रकरण होते. त्यामुळे तो बराच वेळ त्या युवतीशी मोबाईलवर बोलत असायचा. ही बाब संशयित ईश्वर सारकी याला खटकत होती. त्याने त्या युवतीशी संपर्कही साधला होता. त्यावरून महेंद्रा व ईश्वर यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग ईश्वरच्या मनात होता.
रविवारी (ता. ३१) मध्यरात्री अडीचच्या सुमारास महेंद्रा टेरेसवर त्या युवतीशी बोलत होता. त्यावेळी संशयित ईश्वर याने प्रकाश याच्या मदतीने टेरेसवर गेला आणि त्यास बेसावध धरून सुराने गळा चिरला व टेरेसवरून पार्किंगमध्ये फेकून दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशीनंतर दोघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, गुन्हेशाखा युनिट एकचे मधुकर कड, युनिट दोनचे विद्यासागर श्रीमनवार, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.