नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री काळाराम संस्थानच्या वासंतिक नवरात्र महोत्सवास ९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त संस्थानतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी उद्घाटक असतील तर धर्मदाय सहायक आयुक्त टी. एस. अकाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्वस्त मंदार जानोरकर यांनी दिली.
मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाच वाजता कीर्ती भवाळकर व सहकाऱ्यांच्या कथक नृत्याने महोत्सवाची सुरवात होईल. बुधवारी (ता. १०) अतुल तरटे ‘पुरुषोत्तम श्रीराम राष्ट्रपुरुष विषयावर व्याख्यान होईल. गुरुवारी (ता. ११) डॉ. प्रसाद भंडारी ‘बंधविमोचक राम’ विषयावर मार्गदर्शन करतील.
शुक्रवार (ता. १२) कल्याणीताई नामजोशी ‘उपनिषदातील साधना’ विषयावर, तर शनिवारी (ता. १३) विद्याधर ताठे ‘संत जनाबाईची अभंगभक्ती’ विषयावर विमोचन करतील. रविवारी (ता. १४) सुवर्णा देवधर ‘गीतांमधून गीतेतील बोध’ विषयावर, मंगळवारी (ता. १६) धनश्री नानिवडेकर समर्थायन विषयावर कार्पोरेट कीर्तन सादर करतील.
गुरुवारी (ता. १८) ॲड. प्रेरणा देशपांडे ‘मुक्ताई एकपात्री प्रयोग’ सादर करतील. रात्री आठ ते दहादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून यात पार्श्वगायक ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे जोशी, हर्षद गोळेसर, मोहन उपासनी, प्रसाद दुसाने, प्रसाद गोखले, हर्षदा उपासनी, मेघा भास्कर, चित्रा देशपांडे, तेजस माने, दत्तप्रसाद शहाणे, अभिनेत्री गात, कीर्ती शुक्ल, यांच्यासह इस्पॅलियर स्कूलचे चाळीस विद्यार्थी, के. के. वाघ परफॉर्मिंग आर्टचे प्रा. हर्षद वडजे व विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महोत्सवाची रंगत वाढवतील. याशिवाय नित्य कार्यक्रमात पहाटे काकड आरती, मंगल आरती, माध्यान्ह पूजा, कीर्तन सेवा, भजन सेवा, रामायण संहिता पारायण असे कार्यक्रम सादर करतील.
श्रीराम जन्मोत्सव, रथोत्सव:
विशेष कार्यक्रमांतर्गत १४ एप्रिलला प्रतीक पंडित सकाळी साडेसहाला इस्टुमेंटल फ्युजन, तर सात वाजता श्रीरामरक्षा सामुहिक पठण होईल. सोमवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता सप्तमीनिमित्त महाप्रसाद, मंगळवार (ता. १६) सकाळी साडेसात वाजता तुलसीअर्चन, १७ एप्रिलला (बुधवार) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव, तर सायंकाळी सात वाजता अन्नकोट महोत्सव संपन्न होईल. शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेचार वाजता श्रीराम व गरुड रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २०) मंत्रजागर व गोपालकाल्याने महोत्सवाची समाप्ती होईल.