नाशिक (प्रतिनिधी): देशासह राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही काही भागात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली आहे. तर चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आसाममधील गुवाहाटी विमानतळावर रविवारी (31 मार्च 2024) वादळ आणि मुसळधार पावसामुळे गुवाहाटीच्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील छताचा काही भाग कोसळला.
तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाने आज पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता:
सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर, बीड, छ. संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
पावसाचा बंगालला मोठा फटका:
बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली, अनेक घरांचे नुकसान झाले आणि आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही वादळानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात आली आहे.