नाशिक: अल्पवयीनांच्या दप्तरात प्राणघातक शस्त्रे; अवैध हत्यार बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कोयता, चाकू, सुरा असे प्राणघातक शस्‍त्रे बाळगणाऱ्यांचा शहरात सध्या सुळसुळाट असल्‍याचे बघायला मिळते आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे पोलिसांकडून केल्‍या जात असलेल्‍या कारवाईत ताब्‍यात घेतलेल्‍यापैकी बहुतांश अल्‍पवयीन आहेत व या संशयितांकडून शस्‍त्रे लपविण्यासाठी दप्तराचा आधार घेतला जातो आहे.

गुन्‍हे शाखेच्‍या युनिट एकने कारवाई करताना संशयितांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात एका विद्यार्थ्यांकडे कोयता आढळून आला होता. ही घटना ताजी असताना गुन्‍हे शाखेच्‍या युनिट एकने कारवाई करत अल्‍पवयीन बालकांसह इतर संशयितांकडून एकूण नऊ प्राणघातक शस्‍त्रे जप्त केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

काही दिवसांपासून पोलिसांकडून सातत्‍याने कारवाई केली जाते आहे. परंतु तरीदेखील अवैधरीत्या शस्‍त्रे बाळगत दहशत माजविण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही. मंगळवारी (ता. २६) केलेल्‍या कारवाईत मखमलाबाद नाका भागातील चिंचबन, गोदापार्क येथून हत्‍यारांसह संशयित अल्‍पवयीन ताब्‍यात घेतले.

पोलिस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे पोलिसांचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले. तेथे असलेल्‍या संशयितांपैकी एकाला शिताफीने पकडून ताब्‍यात घेतले. हा संशयित अल्पवयीन असल्‍याचे चौकशीतून समोर आले असून, त्‍याच्‍याकडून हस्‍तगत केलेल्‍या दप्तरात पोलिसांना तीन चॉपर आढळून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

त्‍याच्‍याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत गुन्‍हे शाखा युनिट एकमधील पोलिस अंमलदार विलास चारोस्‍कर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्‍या माहितीनुसार, क्रांतीनगर येथील महापालिका उद्यानाजवळील काही युवकांकडे हत्‍यार असल्‍याचे समजले. त्‍यानुसार पथकाने धडक कारवाई करत या परिसरातून संशयितास ताब्‍यात घेतले असून, तो अल्‍पवयीन असल्‍याचे आढळून आले.

त्‍याच्‍याकडून एक गुप्ती आणि दोन चॉपर असे प्राणघातक शस्‍त्र जप्त केले असून, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत पोलिस अंमलदार मुक्‍तार शेख यांना गुप्त बातमीदरामार्फत मिळालेल्‍या माहितीवरून कारवाई केली आहे. घारपुरे घाट परिसरातील महापालिकेच्‍या ग्रीन पार्क उद्यानाच्‍या भिंतीलगत असलेल्‍या संशयिताला पोलिसांच्‍या पथकाने ताब्‍यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

या घटनेतील संशयित हादेखील अल्‍पवयीन निघाला. त्‍याच्‍या ताब्‍यातील शाळेच्‍या दप्तरातून एक कोयता, दोन चॉपर जप्त केले आहेत. चौथ्या घटनेत चांडक सर्कल येथील सेंट फ्रान्सिस शाळेजवळील मार्गावरुन दोघांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पोलिस अंमलदार प्रशांत मरकड व पोलिस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे कारवाई करण्यात आली.

यावेळी पथकाने चेतन गणेश गमे (२१, रा. राहुलनगर, त्र्यंबक रोड), आणि सागर भारत कडाळे (१९, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) या संशयितांना ताब्‍यात घेत, त्‍यांच्‍याकडून एक तलवार व एक कोयता जप्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790