नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पतीच्या निधनानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट नावावर करून घेण्यासाठीच्या प्रक्रियेनंतर वारसाच्या हक्काचे प्रतिज्ञापत्राऐवजी सक्सेशन प्रमाणपत्राशिवाय दस्तनोंदणी करण्यासाठी सबरजिस्टारच्या नावाने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली. लाचखोर वकीलाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संदीप दिलीप कारवाळ (३८, रा. महालक्ष्मी नगर, दसक, जेलरोड, नाशिकरोड) असे लाचखोर वकीलाचे नाव आहे. ४६ वर्षीय तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीने २००५ मध्ये सध्या राहत असलेला फ्लॅट घेतला होता.
परंतु, अद्याप पावेतो सदर प्लॅटचे खरेदीचे दस्तनोंदणी झालेली नव्हती. दरम्यान, २००६ मध्ये तक्रारदार महिलेच्या पतीने अचानक निधन झाले. त्यामुळे सदरील फ्लॅटची दस्तनोंदणी नावावर करून घेण्यासाठी तक्रारदार महिला सातत्याने बांधकाम व्यावसायिकाकडे पाठपुरावा करीत होत्या.
बांधकाम व्यावसायिकाने दस्तनोंदणीची तयारी दाखविल्यानंतर तक्रारदार महिलेस त्यांनी दस्ताची कायदेशीर प्रक्रियेसाठी संशयित लाचखोर वकील संदीप कारवाळ याच्याकडे पाठविले. त्या कामकाजासाठी १ हजार ७५० रुपये शुल्कही व फ्लॅट नोंदणीचे सर्व कागदपत्रे दिली.
परंतु वारस हक्काबाबतचे प्रतिज्ञापत्राऐवजी कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट लागेल. त्यानंतरच दस्त नोंदणी करुन खरेदी होईल असे लाचखोर वकीलाने तक्रारदार महिलेस सांगितले. सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय दस्त नोंदणी करुन खरेदी करावयाचे असेल तर सबरजिस्टरला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून पंच, साक्षीदारांसमोर लाचेची मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. घटनेची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार, शुक्रवारी (ता. २२) नाशिकरोड येथील दत्त मंदिर सिग्नल परिसरामध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचखोर वकील कारवाळ यास दबा धरून असलेल्या पथकाने रंगहाथ अटक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, चौधरी, अनिल गंगोडे, शितल सूर्यवंशी, संजय ठाकरे यांनी कारवाई केली.