नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसर व गोसावीवाडी येथून पाच दिवसांपूर्वी ९० हजारांचा गुटखा जप्त केल्यानंतर, नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना शनिवारी (दि. १६) अजून एक मोठी कारवाई केली.
दोन ड्रम गुटखा, गुटखा पॅकिंग करणारे मशीन, गुटखा पुडीचा प्लास्टिक रोलची वाहतूक करणारी जीप वालदेवी पुलावर रोखली. या जीपमधून सुमारे ९ लाख ४३ हजार रुपये किंमतीची यंत्रसामुग्री व कच्चामाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने पाच दिवसांपूर्वी मध्यरात्री रेल्वे स्थानकाजवळील नालंदा हॉटेलकडून व गोसावीवाडीतील टायटॅनिक बिल्डिंग येथून ९० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव काळे यांना शनिवारी दुपारी गुटखा, गुटखा पॅकिंग करणारे मशीन, गुटखा पुडीचा प्लास्टिक रोल, कच्चामाल सुभाषरोड वरून एका पिकअप गाडीतून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वालदेवी पुलावर पोलिसांनी जीप (एमएच ४१ एयु ५१५९) रोखली. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये दोन ड्रम गुटखा, गुटखा पुड्या पॅकिंग करणारे मशीन, विमल गुटखा पुड्याचा प्लास्टिकचा रोल, गुटख्याचा कच्चामाल मिळून आला. यावेळी पोलिसांनी संशयित रमीज ऊर्फ अजहर रियाज सय्यद (३०, रा. गोसावीवाडी), मोहम्मद अख्तर रजा (२८), ताबिश इरफान शेख (२०), शोएब इम्तियाज पठाण (२०), सूरज शिवपूजन राजभर (२९), रोहित संजय वाळुंज (२६, सर्व रा. मनमाड) यांना अटक केली आहे.
👉 बनावट गुटख्याचा कारखाना ?
पाच दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिसांनी तिघा जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये रमीज ऊर्फ अजहर रियाज सय्यद हा फरार होता. शनिवारच्या कारवाईत मिळालेल्या मालानुसार नाशिकरोड परिसरात बनावट गुटखा कारखाना चालवला जात असल्याचे बोलले जात आहे. यातील बहुतांश आरोपी हे मनमाड भागातील असून रेल्वे गाड्यांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री केला जात असल्याचे बोलले जात आहे.
पाच दिवसांपूर्वी सोमवारी मध्यरात्री रेल्वे स्थानकाजवळील नालंदा हॉटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अजीज रशीद शेख व त्याने दिलेल्या माहितीनुसार गोसावीवाडी येथील टायटॅनिक बिल्डिंगमधून मोहम्मद अली मोहम्मद कासम, सैफुल्ला खान यांना ताब्यात घेऊन २० हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला होता. पकडण्यात आलेला दोन ड्रम गुटखा, गुटखा पॅकिंग करणारे मशीन, गुटखा पुडीचा प्लॅस्टिक रोल, कच्चामाल हा कुठे होता, कुठे घेऊन चालले होते याचा तपास सुरु आहे.