नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर-अंबड लिंक रोडवरील बजरंगनगरमध्ये असलेल्या एका गुदामात शनिवारी (दि. १६) दुपारी साडेचारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. आकाशात ज्वाला व काळ्याकुट्ट धुराचे लोट उठले.
घटनेची माहिती मिळताच एकापाठोपाठ एक अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पत्र्याचे गोदाम असल्याने आग विझविण्यात अडथळा येत होता. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुमारे आठ बंबांच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले.
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बजरंगनगर भागात इलेक्ट्रिक बाइक, चेसीज, स्पेअर पार्टसचे मनसा ऑटोमेशन नावाचे साहिल केडिया यांच्या मालकीचे गुदाम आहे. शनिवार असल्यामुळे ते बंद होते. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीकरिता काही कारागीर आल्यामुळे गुदामाचे शटर उघडण्यात आले होते. अचानकपणे काहीतरी ज्वलनशील द्रवरूप पदार्थ गुदामाजवळ सांडल्याने आगीचा भडका उडाला.
१५ ते २० जवानांनी केला पाण्याचा मारा:
🚒 सुमारे दीड तास शर्थीचे प्रयत्न करत १५ ते २० जवानांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.
🚒 जेसीबीच्या सहाय्याने गुदामाचे पत्रे काढण्यात आले आणि पुन्हा पाण्याचा मारा करून आग विझविली. या दुर्घटनेत संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
🚒 गोदामातील वाहने बेचिराख झाली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्याचे काम सुरू होते.
गोदामात असलेल्या वस्तूंपर्यंत ज्वाला आल्याने आग भडकली, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर, एमआयडीसी, शिंगाडा तलाव मुख्यालय, पंचवटी, कोणार्कनगर विभागीय कार्यालय या अग्निशमन दलांच्या उपकेंद्रांवरून बंब एकापाठोपाठ दाखल झाले. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्यास सुरुवात केली. बघ्यांची या ठिकाणी प्रचंड गर्दी जमल्याने बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. सातपूर पोलिसांनी जमाव पांगविल्यानंतर आपत्कालीन कार्यातील अडथळा दूर झाला.