नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ठेकेदाराने थकित वेतन अदा करणे टाळल्याने सिटीलिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी सलग तिसऱ्या दिवशीही (दि. १६) काम बंद आंदोलन कायम ठेवले. त्यामुळे दीडशे बसेस डेपोत जागेवर उभ्या होत्या. प्रवाशांसह विद्यार्थ्यांना या संपाचा फटका बसला. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
सिटीलिंकच्या दोन डेपोअंतर्गत सुमारे अडीचशेहून अधिक बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कामगारांचे वेतन हे डिसेंबरपासून थकले आहे. यासंदर्भात मागील महिन्यातच सिटीलिंकच्या बस वाहकांनी अचानक संप पुकारला होता. मनपाने मध्यस्थी करीत या कंत्राटदारांशी बोलून आगाऊ वेतन केले. त्यानंतर संप मिटला होता. त्यावेळी दि. ७ मार्चपर्यंत सर्वांना वेतन दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अद्याप वेतन खात्यामध्ये जमा न झाल्याने गुरुवारपासून सिटीलिंकच्या वाहकांनी आंदोलनाची भूमिका घेत बसेस बंद केल्या.
सलग तिसऱ्या दिवशीही सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे वाहक काम बंद आंदोलनावर कायम राहिले. तपोवन डेपोतील दीडशे वाहक कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवल्याने सुमारे दीडशे बसेस बंद आहेत, तर नाशिकरोड डेपोतून केवळ २१ बसेस सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ सुरू असून, त्यामुळे त्यांचे चांगलेच हाल होत आहेत.
त्यातच कर्मचाऱ्यांचे एक कोटी रुपये पीएफमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केल्याचे सांगण्यात येत असले तरी कर्मचाऱ्यांनी मात्र आताचा पगार, मागील थकित वेतन आणि इतर सोयी सुविधा पूर्णपणे दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
संप मिटविण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये यातून संघर्ष निर्माण झाल्याचे सांगण्यात येते; मात्र महापालिकेनेदेखील संप मिटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी या प्रयत्नाला अजून तरी यश आले नाही. त्यामुळे शहरातून आजही बस धावताना दिसत नाही.