नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोदाघाटावरील गाडगे महाराज पुलाजवळ चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
प्रवीण ऊर्फ सनी आबा देवरे (२२, रा. अश्वमेघ नगर, आरटीओसमोर, पेठ रोड) असे अटक केलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार महेश साळुंके यांना गाडगे महाराज पुलाजवळ एक संशयित चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार पथकाने गाडगे महाराज पुलाजवळ दबा धरून असताना संशयित देवरे येताच त्यास अटक केली. चौकशीमध्ये त्याने दोन मोबाईल हिसकावून नेल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. २५ जानेवारी रोजी पंचवटीतून एकाचा मोबाईल देवरे याने हिसकावला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
संशयित देवरे याच्याकडून चोरीचे २५ हजार रुपयांचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनासाठी हवालदार महेश साळुंके, मिलिंदसिंह परदेशी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, राजेश राठोड, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, किरण शिरसाठ यांनी बजावली. संशयित देवरे यास पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.