नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये आहे. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला शरद पवार, संजय राऊत हे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ‘रामराम मंडळी’ म्हणून सभेला सुरुवात केली. नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न मोठा आहे. पण, मीडियामध्ये याची काहीच चर्चा दिसत नाही, असं ते म्हणाले.
मी माझ्या यात्रेदरम्यान लाखो लोकांशी भेटलो आहे, हजारो लोकांशी बोललो आहे. देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे आहेत. पण, मीडियामध्ये या मुद्द्यांचा कुठेही उल्लेख नाही. बॉलिवूडची बातमी दाखवली जाईल. मोदींना २४ तास दाखवलं जाईल. ते कधी समुद्राच्या खाली जातील. त्यांच्यासोबत मीडिया देखील समुद्रात जाईल. त्यांचे पूजा करतानाचे फोटो काढेल. त्यानंतर मोदी विमानातून जातील तिथेही मीडिया असेल, असं म्हणत त्यांनी टीका केली.
पाकिस्तानचा मुद्दा दाखवला जाईल. कोरोना आल्यास मोदी लोकांना थाळी वाजवायला लावतील. सगळ्यांना नाचायला लावतील. मीडिया याला २४ तास चालवते. मीडियाचं काम देशाच्या जनतेचं लक्ष विचलित करण्याचं आहे. हे कशासाठी सुरु आहे. २०-२५ उद्योगपतींसाठी हे सुरु आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
१० वर्षात मोदी सरकारने आपले किती कर्ज माफ केले? एक रुपया तरी माफ केला का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर उभे आहेत. मागे महिनाभर सीमेवर उभे होते. देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींची १६ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. देशातील सामान्य जनतेला हे आकडे समजणार नाहीत, असं राहुल म्हणाले.