नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जीर्ण झालेल्या यशवंत मंडईतील सुमारे १ कोटी रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्यावतीने २३ गाळे सील करण्यात येणार आहे.
तसेच या इमारतीवर लवकरच बुलडोझर चालविण्यात येणार आहे. रविवार कारंजावरील ५० वर्ष जुनी झालेली यशवंत मंडई इमारत जमीनदोस्त करून महापालिकेकडून या ठिकाणी बहुमजली पार्किंग उभारली जाणार आहे. पालिका प्रशासनाकडून स्ट्रक्चर ऑडिट करून ही इमारत धोकादायक असल्याचे सांगत येथील भाडेकरूंना जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या.
मात्र भाडेकरूंनी या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, तरीही न्यायालयात यशवंत मंडईचा निकाल तेथील गाळेधारकांच्या विरोधात गेल्याने मनपा प्रशासनाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
व्यावसायिकांना गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु त्यांनी त्यास विरोध करत मनपाच्या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने गाळेधारकांना दणका देत ही इमारत जीर्ण असून ती पाडण्यास ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे या धोकादायक इमारतीवर बुलडोझर चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे