नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय-ममता थिएटर परिसरातील रविशंकर मार्ग येथे रविवारी गोळीबार होऊन एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली होती. हा सगळा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय-ममता थिएटर परिसरातील रविशंकर मार्ग येथे रविवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास महादेव सोसायटीमध्ये एकाने थेट गोळीबार केला. या गोळीबारात अमोल काटे नावाच्या इसमाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अमोल काटे याचा मृत्यू दोघांनी केलेल्या बेदम मारहाणीत झाल्याचे समोर पोलीस तपासात समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी: दि. १० मार्च २०२४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’ या क्रमांकावर “रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी येथे एक इसमाने चाकुने वार करुन तसेच फायर करुन एका इसमास जखमी केले असुन सदर मारेक-यास पकडुन ठेवले आहे, तात्काळ पोलीस पाठवा” असा कॉल झाल्याने ‘डायल ११२’ मोबाईल तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी त्या ठिकाणी एका इसम रक्तबंबाळ तसेच मयत अवस्थेत दिसुन आला.
या ठिकाणी महादेव पार्क सोसायटी येथे राहणारा चेतन घड़े हा तिथे उपस्थित होता. त्याने सांगितले की, “सदर इसम हा त्याचा भाऊ कुंदन घडे यास रिव्हॉल्व्हर व चाकुने वार करीत असतांना दिसुन आल्याने आम्ही दोघांनी त्यास पकडुन हाताच्या बुक्यांनी मारल्यानंतर तो जमिनीवर कोसळला आहे.” अशी हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी चेतन घडे यास ताब्यात घेतले. त्यानंतर सदर इसमाची ओळख पटविण्यासाठी त्याच्या हातावर गोंदलेले अमोल पोपटराव काटे पाटील या नावाचा आधार घेवुन त्याची ओळख पटविण्यात आली.
त्याचप्रमाणे त्याचा मेव्हणा संदिप राजेंद्र वराडे याने पोलिसांना सांगितले की, कुंदन घडे याचे मयत अमोल काटे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने तो कुंदन घडे यास समजावण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला होता. त्यावेळी चेतन घडे व कुंदन घडे यांनी अमोल याला हेल्मेटच्या सहायाने तोंडावर, डोक्यावर जोराने मारुन जिवे ठार मारले आहे.
उपनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२४ (भारतीय दंड विधान कलम ३०२, ३४) दिनांक ११ मार्च २०२४ रोजी ०३:४९ वाजता दाखल करण्यात आलेला आहे, तसेच या गुन्ह्यात आरोपी नामे चेतन घडे यास अटक करण्यात आलेली आहे.
कुंदन घडे याचे अपोलो हॉस्पीटल येथे घेतलेल्या जबाबावरुन व केलेल्या अधिक तपासावरून उपनगर पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान कलम ३०७, सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कुंदन घडे याचे अमोलची पत्नी हिचे सोबत अनैतिक संबंध होते व त्याचा जाब विचारण्यासाठी अमोल हा घटनास्थळी म्हणजेच महादेव पार्क सोसायटीच्या पार्किग आवारात थांबलेला होता.
कुंदन घड़े हा पार्किग परिसरात येताच अमोलने कुंदन घडे याच्यावर त्याच्याकडील पिस्तुलने फायर केलं… त्याचा नेम चुकल्याने आरोपी कुंदन घडे व मयत यांच्यात झटापटी होवुन कुंदन घडेचा भाऊ चेतन हा त्याच्य मदतीला आला व त्या दोघांनी मिळून त्यास जमिनीवर आडवा पाडुन जिवे ठार मारले आहे असे निष्पन्न झाले.