नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय-ममता थिएटर परिसरातील रविशंकर मार्ग येथे रविवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास महादेव सोसायटीमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एकाने थेट गोळीबार करीत एकाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने सोसायटीतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबारात जखमी अमोल काठे याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून, गुन्हेगारांना गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि काही प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार रविशकर मार्गावर महादेव सोसायटी आहे. रविवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांना पार्किंगमध्ये जोरजोरात भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी थेट पोलिसांना ही घटना कळविली. तोच पुन्हा जोराचा आवाज आल्याने काही लोक खाली आले.
तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोचले होते. पोलिस आल्यानंतर त्यांना घटनास्थळी अमोल काठे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी त्याला त्वरित रुग्णालयात हलविले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
सदरची घटना आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महादेव सोसायटी येथे अमोल काठे आणि कुंदन गदे या दोघांमध्ये वाद झाल्याने कुंदनने त्याच्याकडील पिस्तुलातून काठे यांच्यावर राउंड फायर केले. त्यामुळे अमोल काठे जागीच कोसळला, असे काहींनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात गर्दी झाली होती. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपकाळे, शहर गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आदी घटनास्थळी दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.