नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात 20 चारचाकी वाहने दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): येथील नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्‍या ताफ्यात नव्‍याने २० चारचाकी वाहने दाखल झालेली आहेत. शुक्रवारी (ता.८) आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात कवायत मैदानावर पालकमंत्री दादा भुसे यांच्‍या या वाहनांचा लोर्कापण सोहळा पार पडला.

या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित होते. गेल्‍या काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलिसांकडे वाहनांची कमतरता भासत होती.

उपलब्ध वाहने मोठ्या संख्येने निकामी झाल्याने पोलिस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर विपरीत परिणाम होत होता. त्‍यातच नागरिकांच्या तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी ‘डायल ११२’ योजना कार्यान्वित झाली आहे. याद्वारे नवी मुंबई, किंवा नागपूर कॉल सेंटरवरुन प्राप्त माहिती जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या अधिक जवळ असलेल्‍या वाहनास पुरवली जाते.

त्‍यामुळे तक्रारींची शिघ्रतेने दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ग्रामीण पोलिस दलास वाहनांची गरज वाढली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्‍यामार्फत वाहनांबाबतची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली.

पालकमंत्री दादा भुसे यांनी यांनी प्राधान्‍याने प्रस्‍तावास मंजुरी देताना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. त्‍यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस दलास २० महिंद्रा बोलेरो न्युओ एन-४ वाहने उपलब्‍ध झालेली आहेत.

असा आहे ग्रामीण पोलिस दलाचा विस्‍तार:
नाशिक ग्रामीण पोलिस हद्दीत एकूण ४० पोलिस ठाणे, आठ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, तर अपर पोलिस अधीक्षक व मालेगाव विभाग अशी एकूण ५० कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलिस अंमलदार व अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलिस दल सुमारे १५ हजार चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत.

रात्रगस्‍त, बंदोबस्‍त, नाकाबंदीस मदत होणार:
नवीन वाहनांच्या उपलब्धतेतून ग्रामीण पोलिसांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखताना रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदीसाठी वाहनांचा उपयोग होणार आहे. तसेच पीडितांचे कॉल स्वीकारून त्यावर शिघ्रतेने कारवाई करण्यासाठी मदत होईल. यावेळी महिला दिनाचे औचित्‍य साधत कार्यक्रमास उपस्‍थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते महिला अधिकारी व अंमलदारांचा सत्‍कार करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790