नाशिक (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील वाघाली येथून चोरलेल्या कारसह पळालेल्या भामट्यास पोलिसांनी सप्तशृंगी गड परिसरात जंगलातून ताब्यात घेतल्यानंतर सोबत असलेली अल्पवयीन मुलगी १० वर्षापूर्वी त्यानेच साक्री येथून पळवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. १० वर्षानंतर संबंधित मुलीला आई व मामाच्या ताब्यात देण्यात आले.
एखाद्या चित्रपटाला शोभेल असे कथानक पोलिसांच्या तपासातून पुढे आले. पुणे जिल्ह्यातील वाघळी येथून ३ मार्चला एकाने कार आणि ५० हजार रुपये रोख रकमेची चोरी केली होती. याबाबत कारमालक लक्ष्मण मारुती तांबे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सप्तशृंगी गडावर सांगितलेल्या वर्णनाचा एक व्यक्ती एका मुलीसह असल्याची माहिती मिळाली होती.
वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नांदुरी चंडिकापूर परिसरात तपास केला असता एक संशयित व्यक्ती मुलीसह दिसला. त्याने अनिल अंबादास वैरागर (रा. कौटा. जि. नगर) अशी ओळख दिली. पोलिसांच्या तपासात त्याने कार चोरल्याची कबुली दिली. सोबतची माझी मुलगी रूपाली (१६) असल्याचे सांगितले. त्याच्या व मुलीच्या सांगण्यात तफावत आढळल्याने पोलिसांनी चौकशी केली असता या मुलीस त्याने १० वर्षांपूर्वी ती सहा वर्षांची असताना साक्री (जि. धुळे) येथून पळवून नेल्याचे सांगितले. वणी पोलिसांनी साक्री येथून मुलीच्या आई व मामाला बोलावून घेत त्यांच्या ताब्यात दिले. कारचोर अनिल अंबादास वैरागर यास शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.