नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सायबर भामट्यांकडून अलिकडे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे आमिष दाखवून पैशांचा हव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. आत्तापर्यंतच्या चार गुन्ह्यांमध्ये सायबर भामट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला असून, नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्चशिक्षित इंजिनिअरसह त्याच्या दोघांना तब्बल ४८ लाखांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय इंजिनिअर युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याच्यासह दोन मित्रांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले असता, त्यांची ४७ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी २० सप्टेंबर ते २३ फेब्रुवारी या दरम्यान गंडा घातला आहे.
याप्रकरणी व्हॉट्सअप क्रमांक 7041116371, 9479475042, 9881165583, 9355616924, 7289976985, 9171313959, 8959704419, 9528871634, 8954132586 आणि तक्रारदारांचे पैसे वर्ग झालेले बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयपी अॅड्रेस, चॅटिंग व लोकेशननुसार तांत्रिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.
‘कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडल्यास फसवणूक होण्याची शक्यताच नसते. परंतु जादा परताव्याच्या आमिषांना भूलल्याने फसवणूक होते. त्यामुळे खात्री करूनच आर्थिक गुंतवणूक करावी.”– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.