नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कॅम्प येथील विजयनगरच्या दत्त पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या मयूर अरुण शेटे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व साडेचार लाख रोख रक्कम असा सुमारे ८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्पम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपण घरातील अन्य सदस्यांसह शुक्रवार दि.२९ रोजी दिवसभर साखरपुड्यासाठी गेलो होतो. दिवसभर घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचे नमूद केले आहे. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
लॉक असलेल्या देवघरातील लोखंडी कपाटातून व बेडरुममधील लाकडी कपाटातून रोख रक्कम ४ लाख ५० हजार, ८ हजार रु. किमतीची सोन्याची नथ, २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पट्टी पोत पँडलसह, ५० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र, १२ हजार किमतीचे सोन्याचे टॉप्स, २० हजार रुपयांचा सोन्याचा वेढा, १२ हजार रुपये किमतीचे चांदीचे कॉईन, २ हजार रुपयांचा चांदीचा दिवा व ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे छल्ले, ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे ५ जोडवे व ५०० रुपयांच्या ५० नोटा असा ८ लाख ३८ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.