नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मनमाड रेल्वे जंक्शन स्थानक परिसरात प्रवासा दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोबाइल चोरीचा आळ घेऊन २९ वर्षीय तरुणाला मारहाण करत धावत्या गाडीतून ढकलून दिल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहप्रवाशाने पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.
रोजगारासाठी मुंबई येथे आलेला रोहितकुमार मुकेश गोस्वामी (२९) रा.रामनगर गधाई, झंडा ता. नरवार जि. शिवपुरी (मध्य प्रदेश) हा गावाकडे जाण्यासाठी मुंबई फिरोजपूर पंजाब मेलमधून प्रवास करीत होता. मनमाड रेल्वेस्थानकात गाडीने थांबा घेतल्यानंतर गाडीत २५ ते ३० वर्षीय असलेला, रंगाने निमगोरा, मराठी व हिंदी भाषा बोलणाऱ्या अज्ञात तरुणाने रोहितकुमार गोस्वामी यास मोबाइल चोरी केल्याचा आरोप करून बेदम मारहाण केली.
घातपाताचा संशय:
सदर घटना ही रोहित कुमार याच्या कुटुंबीयांना समजताच त्याचे वडील मुकेश गोस्वामी आणि कुटुंबातील काही व्यक्ती मनमाड येथे आले आणि रोहित कुमार याचा मृतदेह ताब्यात घेऊन एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे आपल्या गावाकडे परतले. दरम्यान, रोहितला पली असून एक लहान मुलगी असल्याचे मुकेश गोस्वामी यांनी सांगितले. सदर प्रकार हा संशयास्पद असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रोहितकुमार याचे वडील मुकेश गोस्वामी यांनी केली आहे.
सहप्रवाशांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात तरुणाने सहप्रवाशांना देखील शिवीगाळ करत रोहितकुमार यांच्या वडिलांना फोनवर रोहित यास रेल्वेतून खाली फेकून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मनमाड स्थानकातून पंजाब मेल भुसावळ प्रस्थान होत असताना धावत्या गाडीतून रोहितकुमार गोस्वामी याला फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सहप्रवासी अजयकुमार श्यामसुंदर साहू (२९) रा. चेनपुरा, ता. पटियाला जि. दमो (मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात इसमावर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.