नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने पॅसेंजर ट्रेनने (प्रवासी) दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आणि आ प्रवासी गाड्यांचे तिकीट दर करोनापूर्वीच्या पातळीवर परतले आहेत. दैनंदिन प्रवाशांवरील आर्थिक भार करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला असून या अंतर्गत रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे ४० ते ५०% कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस भाडे द्यावे लागत होते, परंतु आता भारतीय रेल्वेने ‘पॅसेंजर ट्रेन्स’मध्ये द्वितीय श्रेणीचे सामान्य भाडे बहाल केले आहे. म्हणजेच आता पॅसेंजर ट्रेन्स ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा ‘MEMU/DEMU एक्सप्रेस’ ट्रेन म्हणून ओळखल्या जातात.
‘द इकोनॉमिक्स टाइम्स’च्या अहवालानुसार, मंगळवारी सकाळपासून रेल्वे अधिकाऱ्यांनी मुख्य बुकिंग आरक्षण पर्यवेक्षकांना या बदलाची माहिती दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि ‘शून्य’ ने सुरू होणाऱ्या गाड्यांवरील सामान्य वर्गाच्या भाड्यात सुमारे ५०% कपात केली आहे.
याव्यतिरिक्त, अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमध्ये भाडे संरचनेत सुधारणा करण्यात आल्या. ही भाडे कपात त्या सर्व गाड्यांना लागू आहे ज्यांचे आधी पॅसेंजर ट्रेन म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते आणि त्या आता देशभरात ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा मेमू ट्रेन म्हणून चालवल्या जात आहेत.
कोविडनंतर भाडे वाढ:
२०२० मध्ये कोविड संसर्गाच्या आगमनानंतर रेल्वेने टप्प्याटप्प्याने ‘पॅसेंजर गाड्या’ बंद केल्या होत्या. परिस्थिती सामान्य झाल्यावर पॅसेंजर ट्रेनचे किमान तिकीट १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले. एक प्रकारे एक्स्प्रेस ट्रेनच्या भाड्याशी त्याची सांगड घालण्यात आली.
निर्णयाचे स्वागत:
मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की अनेक गंतव्यस्थानांसाठी तिकीट दर कमी करण्यात आले असून ही कपात गुरुवारपासून लागू झाली आहे. साथीच्या आजाराच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून चार वर्षांपूर्वी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावरही प्रवाशांना एक्स्प्रेसचे भाडे द्यावे लागत होते. ही परिस्थिती आता बदलेल. यामुळे बियाणी यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.