नवी माहिती उजेडात: डॉ. राठी हल्ला प्रकरण
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या सुयोग रुग्णालयाचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी (दि. २३) रात्री रुग्णालयात संशयित आरोपी राजेंद्र मोरे याने धारदार कोयत्याने तब्बल 18 वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून पत्नीची बदनामी करण्याच्या हेतूने पत्रके वाटप केली. यामुळे राठी यांच्यावर हल्ला झाल्याच्या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळाला आहे.
संशयित मोरे हा राहत असलेल्या जुन्या ठिकाणच्या परिसरात एका संशयिताने मध्यरात्रीच्या सुमाराला पत्रके वाटप करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काल पंचवटी पोलिसांच्या हाती लागले.
त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी (दि.२६) सायंकाळी तिघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोमवारी पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतलेल्या संशयितात एक जण डॉक्टर असून दुसरा जुन्या नाशिकमधील एका माजी नगरसेवकाचा जवळचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे.
संशयिताच्या पत्नीची बदनामी व्हावी याच हेतूने स्वतः डॉ. राठी यांनी एका डॉक्टर मित्राची मदत घेतली व त्या डॉक्टरच्या सांगण्या- वरून एका व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधून परिसरात मध्यरात्री काही नागरिकांच्या घरासमोर तसेच परिसरात पत्रके टाकून दिल्याचे पंचवटी पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी डॉ. राठी यांच्या सांगण्यावरून पत्रके वाटप केल्याचा धक्कादायक खुलासा केल्याचे समजते.