नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडीमध्ये पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२८, रा. रत्नदीप रो-हाऊस, कदम मळा, जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना २१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती.
शारदा वसंतलाल चुडासन (५५, रा. पार्वती अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या भाजीपाला घेऊन पायी घराकडे जात असताना आरोपी उमेश याने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजाराची सोन्याची पोत खेचून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन उपनिरीक्षक एस.एस. भिसे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याचे कामकाज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यासमोर सुरू होते. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती सुनिता चितळकर यांनी कामकाज पाहताना साक्षीदार, पंच तपासले.
यात आरोपीविरोधातील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी.पी. गोसावी, विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला.