नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील महामार्गावर नवीन आडगाव नाका येथे उड्डाणपुलाखाली समांतर रस्त्यावर नव्याने बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने शुक्रवारी (दि. २३) दिवसभर वाहतुकीचा बोजवारा उडाला. सायंकाळनंतर या चौकात वाहतूक कोंडी होऊनही वाहतूक पोलिस दिसून न आल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.
आडगावनाक्यावर नव्याने बसविलेले सिग्नल्स बंद पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. चारही दिशेने वाहनचालकांचा बेशिस्तपणा सुरू होता. सायंकाळनंतर रहदारी वाढताच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तरीही येथे वाहतूक पोलिस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पाहणी करत तत्काळ अडचण दूर करणार:
जुना आडगाव नाक्यावरील सिग्नल यंत्रणा नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या सूचनांवरूनच बंद करण्यात आली आहे. सध्या तेथे निरीक्षण सुरू आहे. नवीन आडगाव नाक्यावरील सिग्नल बंद असल्यास पाहणी करून तपासू संबंधितांना सूचना करतो.
चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक