पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश: चौघांना वर्षभर हद्दीत येण्यास मनाई
नाशिक (प्रतिनिधी): वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चार गुन्हेगारांना पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी एक वर्षासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे.
आरोपींच्या दहशतीमुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार देण्यास धजावत नसल्याने गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई मच्छिंद्र वाकचौरे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळीप्रमुख गौरव संजय जाधव (२०), अक्षय गोपाल जाधव (२३), दर्शन दीपक साळवे (१९), सखाराम बापू काकडे (२३) अशी तडीपार झालेल्या गुंडांची नावे आहेत. समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार वेगवेगळ्या भागात केला जात आहे.
यामुळे आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी थेट अशा गुन्हेगारांना नाशिकच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळे आता वाहनांची जाळपोळ, तोडफोड, घरांवर दगडफेक अशाप्रकारचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. जुने नाशिक परिसरातदेखील वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत.