नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोडयेथे सोनाली भानुदास काळे (२४, रा. दत्त मंदिर, नाशिकरोड) या बेपत्ता महिलेच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झाल्यानंतर चार तासांतच पोलिसांनी यशस्वीपणे शोध लावला.
महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरच्यांनी केली होती. त्यानंतर नाशिक रोडच्या निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या डबक्यात वायरने बांधलेल्या एका गोणीत तिचा मृतदेह आढळला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बाबासाहेब दुकले यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
पोलिसांची दोन पथके तयार करून तपास सुरु केला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, गुन्हे शोध पथकाचे सचिन चौधरी, विनोद लखन, सूरज गवळी यांनी घटनास्थळ आणि समोरील घरांची पाहणी केली. त्यावेळी तेथील एका अल्पवयीन मुलाच्या घराशेजारील पत्र्याच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे व शिंतोडे आढळले. या मुलाकडे कसून चौकशी केल्यावर त्याने खून केल्याची कबुली दिली.
शुक्रवारी (ता.१६) दुपारी चारला सोनाली काळे ही तिच्या पतीला फोन करण्यासाठी अल्पवयीनाकडे मोबाईल मागण्यासाठी आली होती. परंतु सोनाली व अल्पवयीन मुलात वाद झाल्याने सोनालीने अल्पवयीनाचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. त्याचा राग आल्याने मुलाने घरातील हातोडीने सोनालीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर तीन वार केले.
जखमी सोनालीला घराच्या बाजूला असलेल्या खोलीत बंद केले. महिलेची सासू, जाव परिसरातून बाहेर गेल्याचे पाहून व आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री झाल्यावर या मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी सोनालीचा मृतदेह प्लास्टिकच्या बारदानामध्ये गुंडाळला.
समोर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या डबक्यात मृतदेह फेकून दिला. सुरवातीला फिर्यादीने महिलेचा पती, सासू, सासरे, दिर, जाव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मात्र, तपासात सत्य समोर येताच पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी खून उघडकीस आल्यानंतर चार तासात यशस्वी तपास केला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहाय्यक निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक सुरेश गवळी, विनोद लख, हवालदार इम्रान शेख, पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंती शिंदे, राहुल जगताप, सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, मुकेश शिरसागर, मिलिंद बागूल, सतीश मढवई यांनी ही कामगिरी केली.