नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रामकुंडावरील वस्त्रांतर गृह ताब्यात घेण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान २ दोन दिवसांपूर्वीच पालिकेने करार संपल्यानंतरही पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाचा बेकायदेशीर वापर केल्याचा ठपका ठेवत संघाकडे कागदपत्रे मागितली होती.
गोदा आरतीच्या अधिकारावरुन पुरोहित संघ, रामतीर्थ समितीत वाद रंगलेला असतानाच आता पालिकेने वस्त्रांतरगृहासाठी हालचाली सुरू केल्या, हे वस्त्रांतरगृह १९९२मध्ये कुंभमेळ्यावेळी बांधले होते. मात्र कालांतराने ते पुरोहित संघाकडे गेले. त्यानंतर झालेल्या दोन्ही कुंभमेळ्याच्या वेळी वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची मागणी झाली. दरम्यान, पुरोहित संघाचा विरोध असल्यामुळे कारवाईमध्ये अडचण येत होती.
वस्त्रांतरगृह पाडण्याच्या हालचाली:
सूर्याची किरणे थेट रामतीर्थात पडतात. परंतु वस्त्रांतरगृहामुळे सूर्यकिरण रामतीर्थाच्या पाण्यापर्यंत पोचत नसल्याचे कारण देत वस्त्रांतरगृह पाडण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याचबरोबर वस्त्रांतरगृहाची इमारत थेट नदीपात्रात असल्याचादेखील मुद्दा उपस्थित केला जात आहे. नदीपात्रात काँक्रिटीकरणाला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीमार्फत काँक्रिटीकरण काढले जात आहे. असे असताना वस्त्रांतरगृहाची इमारत नदीपात्रात असल्याचा मुद्दा उपस्थित करून वस्त्रांतरगृह पाडण्याच्या हालचाली महापालिकेकडून होत असल्याचे समजते.
तर उच्च न्यायालयाचा अवमान:
उच्च न्यायालयाने आमच्या याचिकेवरील निकालात नदी पात्रातील, निळ्या पुररेषेतील अवैध बांधकामे निष्कासित करताना नवीन बांधकामांनही प्रतिबंध केला आहे. आता पुन्हा शासन व प्रशासन नदीपात्रात आणि निळ्या पूररेषेत बांधकाम करण्याचे नियोजन करीत आहे. गोदा मातेचा उत्सव सगळ्यांचा हवा आहे. मात्र बांधकाम करून न्यायालयाचा अवमान व्हायला नको अशा आशयाचे पत्र याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.