“आई, मी खूप अभ्यास करतो; पण यशच येत नाही” म्हणत नाशिकच्या तरुणाची दिल्लीत आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिल्ली आयआयटीत एमटेक शिकणाऱ्या नाशिकच्या विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास ३ महिने बाकी असताना दिल्लीतील वसतिगृहातच गळफास घेतला. ‘मी खूप अभ्यास करतो… परंतु, यशच येत नाही’ हे त्याने आईला फोनवर सांगितले होते. हे त्याचे घरी शेवटचे बोलणे ठरले. वरद संजय नेरकर (२४) असे मृताचे नाव आहे.

पंचवटीतील हनुमानवाडीत वरदचे कुटुंबीय राहतात. गुरुवारी दुपारी वरदने आईला फोन केला होता. माझी लिटमस टेस्ट निगेटिव्हच येत असल्याचे सांगून तो जोरजोरात रडत होता. आईने समजूत काढत टेन्शन घेऊ नको असे काळजीपोटी सांगितले. पण तो अभ्यासात यश येत नसल्याचे वारंवार सांगून त्याने फोन ठेवून दिला. आईने पुन्हा कॉल केल्यावर नंतर बोलतो असे म्हणून त्याने फोन ठेवला.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

त्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत आईने सतत कॉल केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कुटुंबीयांनी आयआयटीतील त्याच्या मित्रांना फोन केले. ते द्रोणाचार्य वसतिगृहातील वरदच्या खोलीकडे धावले, पण दरवाजा आतून बंद होता. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा वरद गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

सहा महिन्यांपासून तणावात.. असे करेल असे वाटले नाही:
माझा वरद अतिशय हुशार होता. दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकला घेऊन त्याने जळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पेन्टमध्ये बी.टेक केले. आयआयटी दिल्लीत एमटेकसाठी त्याची निवड झाली. गेल्या सहा महिन्यांपासून तो खूप त्रस्त होता. अभ्यासाचा दबाव असल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडण्याची देखील तयारी केली होती. पण तो असे पाऊल उचलेल असे वाटत नव्हते. पालकांनी मुलांशी सतत संवाद साधून त्याला मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेताना त्याच्या समस्या विचारात घेतल्या पाहिजे. त्यांच्यावर दबाव न टाकता समजून घ्या. मुलांनीदेखील टोकाचे पाऊल न उचलता घरी परतावे. अभ्यासक्रमाचा ताणतणाव घेऊ नये. – संजय नेरकर, वरदचे वडील

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

तणावामुळे दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता…
अभ्यासाच्या तणावामुळे दोन महिन्यांपूर्वीच वरद घरी आला होता. नाशिकमध्येच पुढील शिक्षण घे किंवा या शिक्षणावरही नोकरी लागेल, असे सांगत घरच्यांनी त्याला दिलासा दिला. पण १० ते १५ दिवस घरी थांबून तो पुन्हा दिल्लीला गेला. मी अभ्यासक्रम पूर्ण करणारच असे तो म्हणाला होता. – अथर्व नेरकर, वरदचा भाऊ

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790