नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे (४६, रा. गौळाणे रोड) यांचे हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी (दि.१३) कर्तव्यावर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे यांच्या निधनाची वार्ता समजताच अंबड पोलिस ठाण्यासह आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन सोनवणे आपले कर्तव्य निष्ठेने बजावत असताना त्यांनी जनतेसोबत जिव्हाळ्याचे संबंध जपले होते.
अकाली निधनाने पोलिस दलासह संपूर्ण सिडको व अंबड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तेथे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह त्यांचे नातेवाईक, तसेच मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दोन वर्षापूर्वीच ते अंबड पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. त्याअगोदर इंदिरानगर पोलिस ठाणे गोपनीय, शहर वाहतूक शाखा व सुरुवातीला रेल्वे पोलिस दलातही त्यांनी कर्तव्य बजावले आहे. चांदवड तालुक्यातील त्यांच्या दुगाव या मूळ गावी मृतदेहावर शासकीय इतमामात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.