नाशिक (प्रतिनिधी): मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील गुरुवारी (दि. ८) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सात वाजताच त्यांचे नाशिक शहरात आगमन होईल. शहरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर दिंडोरी, कळवण, मालेगाव, नांदगावमार्गे ते छत्रपती संभाजीनगरला रवाना होणार आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली.
…असा आहे दौरा:
गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता ते मुंबईहून नाशिककडे मार्गस्थ होतील. सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती नाना बच्छाव यांनी दिली. दिंडोरी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथून ते वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते कळवण, देवळा येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. कंदाना फाटा येथे अहिल्याबाई देवी होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सटाणा येथे यशवंतराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन ओंदाने, विरगाव, ताहराबाद, अंतापूर मार्गे सकाळी ११ वाजता ते साल्हेर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील.
त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साल्हेर किल्ल्यावर शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, मनमाड, मालेगाव चौफुलीमार्गे ते नांदगाव शहरात पोहोचतील. दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी जरांगे हे केवळ सत्कार स्वीकारणार असून, कुठेही ते मनोगत व्यक्त करणार नसल्याची माहिती सकल मराठा समाजाचे करण गायकर यांनी दिली.