दिल्लीच्या कंपनीकडे काम : ‘एन कॅप’ अंतर्गत साडेसात कोटींचा खर्च
नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या ‘एन कॅप’ योजनेअंतर्गत (राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम) शहरात पहिल्या टप्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे.
राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान येथे चार्जिंग स्टेशन होणार आहेत.
शहरातही इलेक्ट्रिक वाहनास पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता महापालिका ‘एन कॅप’ योजनेअंतर्गत शहरात पुढील काही वर्षांत १०६ इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशन उभारणार असून, पहिल्या टप्यात वीस स्टेशन उभारली जाणार आहेत.