नाशिक (प्रतिनिधी): परिसरात विविध ठिकाणी तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सगळीकडे बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठा विभागाचा बेजबाबदारपणा समोर येत असून अधिकारी नागरिकांचे फोन उचलायला तयार नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सिडकोतील प्रभाग क्र. ३१, प्रभाग क्र. २७ व प्रभाग क्र. २४ या संपूर्ण भागात सर्वात जास्त अडचण उभी राहिली आहे. यातील बहुतेक भागांना मुकणे धरणातून पाणीपुरवठा होत असतो. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून या ठिकाणी नवीन पाइपलाईन टाकण्यात आली आहे.
तरीसुद्धा पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. सिडको विभागातील पाणीपुरवठा विभागाची ही जबाबदारी आहे. मात्र हे अधिकारी नागरिकांचे फोनच उचलत नसल्याने पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार? याबाबत माहिती समोर येत नाही.
37 Total Views , 1 Views Today