नवी दिल्ल्ली (वृत्तसंस्था): पेटीएम युजर्ससाठी मोठी बातमी समोर आली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड PPBL वर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.
RBI ने कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आढळलेल्या कमतरतेच्या आधारे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सादर केलेल्या माहितीमध्ये अनियमितता आढळून आल्याचं बँकेचं म्हणणं आहे.
त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली असून यानंतर आता पेटीएमच्या कोणत्या सर्व्हिस सुरु राहणार आणि कोणत्या सर्व्हिस बंद राहणार याविषयी जाणून घेऊयात.
पेटीएम वॉलेट, पेमेंट बँक खाती इत्यादीमधील शिल्लक रक्कम तुम्ही काढू किंवा वापरू शकतात. कोणत्याही निर्बंधांशिवाय त्याचा वापर करण्यास युजर्सला परवानगी आहे.
29 फेब्रुवारी नंतर तुम्ही तुमच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. 29 फेब्रुवारी 2024 नंतर, कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट, प्रीपेड उपकरणे, फास्टॅग, NCMC कार्डमध्ये टॉप अप किंवा ठेव किंवा क्रेडिट व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, पेटीएम पेमेंट्स बँक 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणतीही बँकिंग सेवा देणार नाही. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे नियम न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पेटीएम बँक सातत्याने नियमांकडे दुर्लक्ष करत होती. आरबीआयला ऑडिटमध्ये पर्यवेक्षकीय त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायद्यांतर्गत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.