नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच त्याला बिअर पाजली आणि त्यानंतर साथीदाराच्या मदतीने गळा आवळून, तोंडावर उशी ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. तर तिच्या साथीदाराने विषारी साप आणून दंशही केला.
परंतु नशिब बलवत्तर असलेल्या पतीने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढला. वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचल्याने पत्नी अन् तिच्या साथीदाराने त्यास जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे बिंग फुटले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयित पत्नीसह तिच्या अज्ञात दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप (रा. साईप्रसाद बंगला, बोरगड, म्हसरुळ) असे संशयित पत्नीचे नाव असून, तिच्या साथीदारांचे नाव समजू शकलेले नाही. म्हसरुळ पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.
विशाल पोपटराव पाटील (रा. साईप्रसाद बंगला) याच्या फिर्यादीनुसार, दोघांमध्ये आर्थिक कारणावरून सतत वाद होतात. त्यावरून काही महिन्यापासून संशयित सोनी घर सोडून निघून गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती परत आली होती.
गेल्या शनिवारी (ता. २७) तिने पतीला बिअर आणण्यास सांगितले असता त्याने पैसे नसल्याचे कारण देत नकार दिला. तर सोनी हिने त्यास बिअरसाठी पैसे दिले. त्यानंतर रात्री तो हॉलमध्ये बिअर पित असताना, सोनी हिने घराचा मागचा दरवाजा उघडा ठेवला व स्वयंपाक घरात गेली.
त्यावेळी मागच्या दरवाजाचे हेल्मेट व चष्मा घातलेला अज्ञात व्यक्ती घरात शिरला आणि त्याने विशाल याचा पाठीमागून गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित सोनी हिनेही त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्यास मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी झटापटही झाली असता, संशयित व्यक्तीने त्याच्याकडील सॅकमधून विषारी साप काढला आणि विशाल यांच्या गालावर त्या सापाने दंश केला. या झटापटीमध्ये विशाल याने दोघांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढला.
विशाल याने मित्राच्या मदतीने जिल्हा रुग्णालय गाठले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी रचला बनाव:
विशाल यांनी सुटका करून घेत घराबाहेर पळ काढला. त्यानंतर संशयित पत्नी सोनी हिनेही स्वत:च म्हसरुळ पोलीस ठाणे गाठून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची कहाणी सांगत बनाव रचला.
परंतु तिच्या एकूण वर्तनावरून पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तिला घरी जाण्यास सांगत पोलीस पोहोचतील असे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातून घटनेची माहिती मिळताच तिचा बनाव उघड झाला.
तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिस विशाल याच्या घरी पोहोचले असता संशयित पसार झाले होते. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
“पोलीस संशयित पत्नीसह तिच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल.” – किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक