नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवर महिरावणी येथे २६ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात त्र्यंबकेश्वर पोलिसांना यश आले. पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी हॉटेलच्या वेटरला अटक केली.
क्षुल्लक कारणातून वेटरने या अनोळखी युवकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मण शंकर जाधव (३२, रा. फुलेनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिरावणी येथे एका युवकाचा खून झालेला मृतदेह आढळून आला होता. पथकाने मृतदेहाची ओळख पटवत तपास केला.
पोलिस तपासानुसार, लक्ष्मण जाधव हा युवक त्र्यंबकेश्वर येथील नातेवाइकाकडे राहण्यास आला होता. पायी जात असताना संशयित नीलेश सुरेश नांदे (रा. मोखाडा) याने लक्ष्मण जाधवला हटकले. या प्रकारामुळे संतापलेल्या जाधवने शिवीगाळ केल्याने संशयित नांदे याला राग आला.
संशयित नांदेने चाकूने वार करत त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह झाडीत लपवला आणि तो पळून गेला. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकाने परिसरातील हॉटेल, ढाबे व चहाच्या दुकानांवर तपास केला असता संशयिताचे नाव निष्पन्न झाले. पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत.