नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वातावरणात वाहणारा गार वारा व पाऱ्यात झालेली घसरण यामुळे थंडीचा तडाखा वाढला आहे. बुधवारी (ता. २४) निफाडचे किमान तापमान ५.६ अंश सेल्सिअस, तर आज (दि. २५ जानेवारी) नाशिकचे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.
यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. तसेच प्रथमच राज्यात नाशिकचे किमान तापमान नीचांकी राहिले आहे.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पारा आणखी घसरून थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाच्या हंगामात खऱ्या अर्थाने थंडीची अनुभूती जानेवारी महिन्यात येत आहे. यापूर्वी पाऱ्यात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने कधी थंडी, तर कधी कडक उन्हाचा अनुभव नाशिककरांना येत होता.
परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा परतला असून, सायंकाळनंतर कमालीचा गारठा जाणवू लागला आहे. यापूर्वी नाशिकचे किमान तापमान १६ जानेवारीला ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान होते. मात्र थंडीचा तडाखा वाढला असल्याने बुधवारी नाशिकचे किमान तापमान ९ अंशांपर्यंत घसरले असून, यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले आहे.
जिल्ह्यात निफाडमध्ये सर्वाधिक गारठा जाणवतो आहे. या दिवशी निफाडच्या तापमानात घसरण होऊन ५.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झालेली आहे. यापूर्वीपर्यंत साधारणतः जळगावचे किमान तापमान राज्यात नीचांकी राहात होते. परंतु प्रथमच राज्यस्तरावर किमान नीचांकी तापमान नाशिकचे राहिले आहे.
शेकोट्या पेटायला सुरुवात:
आतापर्यंत विशेष गारठा जाणवत नसल्याने स्वेटर, जॅकेटने बचाव होत होता. परंतु सध्या कमालीचा गारठा जाणवत असल्याने शहरी, तसेच ग्रामीण भागांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.