नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या आरक्षण तपासणीसाठी महापालिकेच्या सुमारे २७०० कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वेक्षणासाठी मनपाचे सफाई सेवक सोडून इतरांना हे काम देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईतील आंदोलनासाठी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्य सरकारची आता धावपळ सुरू झाली असून कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
जिल्ह्यात दोन लाख आठ हजार ४० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर मंगळवारपासून शहरात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे २७०० सेवक प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत मनपा सेवक शहरातील घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.