अतिक्रमण टाळण्यासाठी मोजणी करा; महापालिका आयुक्तांना निवेदन
नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर येथील इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅकचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे, हे काम प्रायोजकाकडून त्वरित सुरू करावे. संबंधित प्रायोजकाकडून महापालिकेच्या ताब्यातील जागेत अतिक्रमण झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांना याबाबत शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक महापालिका स्थायी समिती सभा क्रमांक २८ मध्ये विषय व ठराव क्रमांक १००८ हा २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर करण्यात आला. श्रीजी ग्रुप तर्फे श्री. अंजनभाई पटेल, नाशिक यांच्याकडून इंडिगो पार्क ते आर डी सर्कल येथील जॉगिंग ट्रॅक सुशोभिकरण करणे व देखभाल करणेस या ठरावान्वये मंजुरी देण्यात आली. तेवीस महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. हे काम सुरू व्हावे यासाठी यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने २४ एप्रिल २०२३, तसेच ४ जुलै २०२३ रोजी असे दोनवेळा निवेदने दिली आहेत. मात्र, त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित विकासकाला प्रायोजक म्हणून काम दिल्याने इंडिगो पार्कजवळील या जॉगिंग ट्रॅकसाठी दोन वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पातही तरतूद केली गेली नाही. विकासकही काम करत नाही आणि महापालिकाही यासाठी पैसे उपलब्ध करत नाही, यामुळे जॉगिंग ट्रॅकचा विकास थांबला आहे. येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करावे.
जॉगिंग ट्रॅकलगत या प्रायोजकाचे मोठे बांधकाम सुरू आहे, त्याचे अतिक्रमण होवू नये, जॉगिंग ट्रॅककडून बांधकाम साईटला प्रवेश देण्यात येवू नये, यासाठी मोजणी करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, भारती देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, दिलीप निकम, डॉ. राजाराम चोपडे आदींसह नागरिकांनी दिला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790