नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): परप्रांतिय प्रेयसीसमवेत सिन्नरमध्ये राहत असताना, तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
२०१९ मध्ये सदरची घटना सिन्नर शहरात घडली होती.
दरवेश गेंदालाल चौरे (४०, मूळ रा. भोपाळ) असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर पोलीसात दाखल फिर्यादीनुसार, रेखा मेहरा (रा. भोपाळ) हिच्याशी आरोपी दरवेश याचे प्रेमसंबंध होते. रेखा विवाहित व तिला एक मुलगी रिया होती.
दोघींना घेऊन तो सिन्नरमध्ये राहण्यास आला होता. संजीवनी नगरमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहत होते. मात्र दरवेश हा रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांच्या सतत वाद व्हायचे.
२१ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपी दरवेश याने झालेल्या वादातून रेखाचा ओढणीने आवळून तिचा खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुलगी रिया शाळेत आली असता तिने आईचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही.
त्यामुळे पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला असता, रेखा बाथरुममध्ये मृत आढळून आली. याप्रकरणी सिन्नर पोलिसात दरवेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक एस.पी. पाटील, उपनिरीक्षक सुदाम एखंडे यांनी केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शिरिष कडवे यांनी १८ साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात दोषसिद्ध झाल्याने न्या. जगमलानी यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.