नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या १ जानेवारी रोजी भरदुपारी सामनगाव रोडवरील दुकानात एकट्याच असलेल्या ७० वर्षीय महिलेवर हत्याराने वार करून त्याच्या गळ्यातील व कानातील दागिने चोरून नेणाऱ्या संशयिताला अखेर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.
त्यानेच, गेल्या जून २०२३ मध्ये उपनगरमध्ये ६० वर्षीय महिलेचाही अशारितीने खून करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यांनंतरही वयस्क महिलेला हेरून पुन्हा अशाच रितीने गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या या सायको किलरला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यास २२ तारखेपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशाल प्रकाश गांगुर्डे (३५, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या १ जानेवारी रोजी सामनगाव रोडवर सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्स असून, या दुकानात शकुंतला जगताप (७०) या दुपारच्या वेळी एकट्याच असायच्या.
ही बाब संशयित विशाल याने हेरली होती. घटनेपूर्वी दोन-तीन वेळा तो दुकानातही गेला होता. घटनेच्या दिवशी तो काहीतरी खरेदीच्या बहाण्याने दुकानात गेला.
शकुंतला या वस्तू घेण्यासाठी दुकानात वळताच संशयित विशालने पाठीमागून त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने जोरदार प्रहार केला आणि त्याच्या गळ्यातील, कानातील दागिने खेचून पोबारा केला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न करून लुट केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते.
पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळविली. परंतु घटनेपासून शहरातून पसार होत, देवळा, कळवण, वापी, वाडा, विक्रमगड, जोगेश्वर-मुंबई, विरार, भाईंदर येथे ठिकाणे बदलत फिरत होता.
अखेर तो कसारा परिसरात आल्याची खबर मिळताच युनिट एकच्या पथकाने सापळा रचून विशालला अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, प्रविण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने बजावली. याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाला पारितोषिकही दिले.
बेलेकर यांच्याही खुनाची झाली उकल:
१८ जून २०२३ रोजी उपनगर परिसरातील लोखंडे मळ्यात राहणाऱ्या सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (६०) यांचा खून झाला होता. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीसांच्या हाती काहीही धागेदोरे मिळून आले नव्हते.
विशेषत: घराचा समोरील दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे खुनाचे गुढ कायम होते. मात्र, विशालची मोडस पाहता पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने बेलेकर यांच्या खुनाचीही कबुली दिली.
बेलेकर या घरात एकट्या असल्याची संधी साधून तो त्यांच्या घरात पाठीमागील दरवाजाने गेला आणि डोक्यात टणक वस्तूने मारून त्याच्या अंगावरील दागिने चोरून पळाला होता. सकाळी वेळ असल्याने कोणाच्याही नजरेत आला नव्हता. तसेच येथेही त्याने रेकी केली होती.
“वयस्क महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा संशयिताला अटक केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे.”– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा