नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वातावरणातून गायब झालेला गारवा आता पुन्हा परतला आहे. दिवसा काही प्रमाणात ऊन लागत असले तरी सायंकाळनंतर गार वाऱ्यामुळे थंडीची अनुभूती नाशिककरांना येते आहे.
गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात साडे चार अंशांची घसरण झालेली असून मंगळवारी (ता.१६) किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस तर कमाल ३०.७ अंश सेल्सिअस राहिले.
यंदाच्या हंगामात नाशिकला अपेक्षेप्रमाणे थंडी जाणवलेली नाही. ऑक्टोबर अखेरपासून कधी थंडी तर कधी उकाड्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातून गारवा पूर्णपणे गायब झाला होता.
परंतु दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी (ता.१५) नाशिकचे किमान तापमान ११.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
तर कमाल तापमानदेखील २९.३ अंश सेल्सिअसहून अधिक झालेले होते. येत्या काही दिवसांत थंडीचा तडाखा आणखी वाढणार असून, यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविला आहे.
दिवसा उन्हाचा तडाखा:
सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असला तरी दिवसाच्या वेळी मात्र प्रखर सूर्यकिरणांमुळे उन्हाचा तडाखा जाणवतो आहे.
विशेषतः दुपारी बारा ते दोन या वेळेदरम्यान तप्त सूर्यकिरणांमुळे कमाल तापमान अद्यापही वाढलेले आहे.
नाशिक तिसऱ्या स्थानी:
राज्यात थंडीची लाट सध्या बघायला मिळत आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस राज्यात नीचांकी राहिले.
त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरचे किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस राहिले असून, किमान तापमानाच्या अनुषंगाने नाशिक तिसऱ्या स्थानी आहे.