नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई – आग्रा महामार्गावरील पाडळी गावाजवळ नाशिकवरून मुंबईकडे जाणाऱ्या कारला रोखत कोयत्याने कारच्या काचा फोडल्या.
तसेच, कारमधील दोघांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील रोकड, मोबाईल असा ८२ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून घेतल्याचा प्रकार घडला. शनिवारी (ता. १३) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली.
द्राक्ष निर्यातदार व्यापारी नवीन सुरेशकुमार जैन (रा. नायगाव, क्रॉस रोड, दादर, मुंबई) कामानिमित्ताने शनिवारी (ता. १३) नाशिक जिल्ह्यात आले होते.
रात्री ते त्यांचा मित्र पेडणेकर यांच्यासमवेत परत मुंबईला त्याच्या टाटा हॅरिअर कारने (एमएच ०१ सीक्यु ३०९०) निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गाने जात असताना पाडळी गावाजवळ त्यांच्या कारला तिघा संशयितांनी रोखले.
त्यावेळी संशतियांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयत्याने कारच्या वार करून फोडल्या. तसेच, जैन व पेडणेकर या दोघांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ७२ हजार रुपयांचे तीन मोबाईल व १० हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून घेत पसार झाले.
सदरची घटना शनिवारी (ता. १३) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.
दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर निर्जनस्थळी कार, ट्रक अडवून लुटमारीच्या घटना सातत्याने घडतात. यातील बहुतांशी वाहनचालक पोलिसात तक्रारीसाठी जात नाहीत. परंतु लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे.
या घटनेमुळे महामार्गावर लुटमारीच्या घटनांना बळ मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करतात याकडे आता लक्ष लागले आहे.