नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूरला नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील उज्ज्वल एजन्सीसमोरील चौकात शनिवारी (दि. १३) रात्री १० वाजता दुचाकी व कारच्या अपघातात मुस्तफा शौकत खान (२४, रा. अंबड लिंकरोड) हा युवक जागीच ठार झाला असून अन्य तिघे जखमी झाले.
उज्ज्वल एजन्सीजवळील चौकात वारंवार अपघात घडत असतानाही प्रशासनाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. आतापर्यंत येथे पाच जणांचे अपघाती बळी गेले आहेत.
आयटीआय सिग्नल सुटल्यानंतर वाहने सुसाट वेगाने निघतात. पुढे थोड्याच अंतरावर उज्ज्वल एजन्सीचा चौक असून या चौकात सिडको व औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने वळण घेतात. त्यामुळे येथे नेहमीच छोटे मोठे अपघात घडतात.
शनिवारी रात्री नाशिकहून सातपूरच्या दिशेने जात असलेली दुचाकी क्रमांक एमएच १५ डीएफ ३१९० व पल्सर एमएच ०३ डीएम ३४५२ जात होत्या. वळणावर नाशिकहून सातपूरच्या दिशेने येत असलेल्या कार क्रमांक एमएच १५ जीए ०२८० ने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात पल्सरवरील दोघांपैकी मुस्तफाला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर दोन्ही दुचाकीवरील तिघे जखमी झाले.