नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एक हजार ते १२ हजार रुपयांची गुंतवणूकीवर दोन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्जाचे आमीष दाखवून गोरगरिबांची आर्थिक फसवणुकीचा भांडाफोड झाल्याने आत्तापर्यंत ५०० पेक्षा अधिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणाची मुख्य सूत्रधार लतिका खालकार उर्फ लावण्या पटेल हिच्या घरझडतीत ११ तोळे सोने आर्थिक गुन्हेशाखेने जप्त केले आहे.
दरम्यान, याप्रकरणात संशयित लतिका हिच्या पोलीस कोठडीत येत्या सोमवारपर्यंत (ता. ८) वाढ केली आहे तर, उर्वरित पाच संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याने त्यांना नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गेल्या ३१ डिसेबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेस या कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने मुख्य संशयित लतिका खालकर उर्फ लावण्या पटेल, नवनाथ खालकर, सुगर औटे, विनोद जिनवाल उर्फ विकी, मोईनअली सय्यद, उत्तम जाधव यांना अटक केली होती.
यात लतिका खालकर ही मुख्य सूत्रधार असून, तिनेच बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरचा फ्रॉड केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीमध्ये येत्या सोमवारी (ता.८) पर्यंत वाढ केली आहे. तर उर्वरित पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने लतिका हिच्या सिडकोतील घराची झडती घेतली असता, त्यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांसह सात लाखांचे ११ तोळे सोने जप्त केले आहे. पोलीस तपासातही तिच्या चौकशीत सातत्याने विसंगती आढळून आली आहे. तसेच, या सार्या प्रकरणात तीच मुख्यसूत्रधार असल्याचेही समोर आले आहे.
तर, संशयित कृष्णाराव रेड्डी, माधवन कृष्णन, श्रीनिवासन, शफिक शेख, जयश्री गांगुर्डे, भाग्यश्री लिलके, तेजस्वीनी अंभोरे, लता हिरे, शिला, अलका लोंवय, परशुराम गावित, अशोक निकम, सलीम खान यासह वीस जणांचा पोलीस शोध घेत आहेत. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, संजय पिसे हे तपास करीत आहेत.