नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शासकीय व निमशासकीय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची चौघांनी अठरा लाख रुपयाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. दोन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने तरुणाने पैशांसाठी तगादा लावला असता संशयितांनी दमदाटी केली.
त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणाने थेट पोलिस स्थानक गाठत या चौघांविरुध्द तकार केली. त्यानंतर याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप दुगड, करण राजपूत, विपूल जाधव व राठोड नामक इसम अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी गोकुळ बाबुराव चुंभळे (रा. गौळाणे ता.जि.नाशिक) या युवकाने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार व संशयित एकमेकांचे परिचीत असून, २०२२ मध्ये संशयितांनी गाठून ही फसवणुक केली. चुंभळे यांना शासकिय व निमशासकिय कार्यालयात ओळखी असल्याचे भासवून व अधिका-यांशी चांगले संबध असल्याचे दर्शवून नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. चांगली नोकरी मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आल्याने चुंभळे यांचा विश्वास बसला. या मोबदल्यात लाखों रूपयांची मागणी करण्यात आली.
चुंभळे यांनी १ मार्च २०२२ रोजी खुटवडनगर येथील माऊली लॉन्स भागात संशयिताची भेट घेत १८ लाख रूपये संशयितांच्या स्वाधिन केले. मात्र अद्याप नोकरी लागली नाही. पाठपुरावा करूनही नोकरीचे काम होत नसल्याने त्यांनी पैशाचा तगादा लावला असता संशयितांनी दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.